तालुक्यातील लाभार्थीना किराणा किटचे वाटप
पिंपळगाव बसवंत: शासनाची खावटी अनुदान योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चितच सहकार्य करणार आहे. निफाड तालुक्यातील १२२७७ लाभार्त्यांपैकी १११९४आदिवासी बांधव खावटी अनुदानास पात्र ठरले असून ज्या आदिवासी बांधवांचे नाव या योजनेतयेणार नाही त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून खावटी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केले.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना खावटी योजने अंतर्गत किराणा किटचे वाटपप्रसंगी आमदार बनकर बोलत होते.यावेळी व्यासपीठावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक विभागाच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, आदिवासी विभागाचे अधिकारी राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी भोई, निफाडचे गटविकास अधिकारी संदीप कराड, सिद्धार्थ वनारसे आदीसह प्रतिनिधी स्वरुपात पात्र लाभार्थी उपस्थित होते.
पुढे आमदार बनकर म्हणाले की, निफाड तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत खावटी अनुदान योजना पोहोचवण्यासाठी निफाड तालुक्याचा आमदार या नात्याने मी संपूर्णपणे प्रत्येक गावामध्ये या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्या लाभार्थीना लवकरच लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच खावटी अनुदानाचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे आवाहन आमदार बनकर यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी पहिल्यांदा ही योजना निफाड तालुक्यात आम्ही राबवत असून संपुर्णपणे योजना राबविण्यासाठी आम्ही तत्पर असून कुठलाही लाभार्थ्याला काही अडचण आल्यास त्यांनी थेट आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आदिवासी प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी केले.
किराणा किटचे वाटप…..
या योजने अंतर्गत वाटप ५० टक्के वस्तू स्वरुपात व ५० टक्के रोख स्वरुपात करण्यात येते. वस्तू स्वरुपात मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद डाळ, तुरडाळ, साखर, शेगदाना तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापती आदी वस्तूंचे वाटप आदिवासी बांधवांना करण्यात आले आहेत.