पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील नवीन, पात्र व वारसाने झालेल्या सभासदांना कर्जवाटप करा तसेच शासनाने जाहीर केलेल्या ३ लक्ष रुपये पर्यंत ० टक्के व्याज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी केले.
पिंपळगाव बसवत येथे आयोजित करण्यात आलेल्या निफाड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन, व्हा.चेअरमन, संस्था प्रतिनिधी, सचिव तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक पिंगळे, प्रशासन अधिकारी धनवटे, सहायक निबंधक अभिजित देशपांडे, विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे, सहायक विभागीय अधिकारी गरुड, बँक इन्स्पेक्टर, शाखाधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीत विविध कार्यकारी सोसायटीच्या अडचणी जाणून घेतल्या. यात नवीन, पात्र, वारसाने झालेल्या सभासदांना कर्ज पुरवठा करणे. शासनाने दिलेल्या तिन्ही कर्जमाफीत वंचित राहिलेल्या सभासदांना कर्ज माफीचा लाभ देणे, मध्यम मुदत कर्ज वाटप व्हावे. बँकेने थकलेल्या सभासदांचे व्याज वसूल केले परंतु सोसायटी स्तरावर त्या थकीत सभासदांचे व्याज वसूल झालेले नाहीत. या बाबतीत बँकेने सहकार्य करावेत. बँकेमार्फत मध्यंतरीच्या काळात कर्जपुरवठा होत नव्हता असे चांगले प्रामाणिक, कष्टकरी सभासद इतर बँकेत गेले सोसायटीचे कर्ज प्रक्रिया सोपी व सोईची असून त्यांना पुन्हा आपल्याकडून कर्ज घ्यायचे आहेत. याकरिता त्यांनाही कर्ज पुरवठा करावा. एकाच कुटुंबातील सदस्याचे कर्ज थकले व त्याच कुटुंबातील सदस्याचे नावे बँकेत पैसे असतील तर ते कर्ज खाती वर्ग करावे जेणेकरून वसुली होईल अशा सूचना उपस्थित प्रतिनिधींनी मांडल्या.
ता
लुक्यातील अनिष्ट तफावतीत असलेल्या संस्थांना खिश्यातील पैसे टाकत मदत करून बाहेर काढले. त्यामुळेच तालुक्यातील काही संस्था यातून बाहेर आल्या व कर्ज पुरवठा सुरळीत झाला त्याबद्दल आमदार दिलीप बनकर यांचे आभार मानले. बँकेने मागील काळात रोखीने कर्ज वाटप केले असून त्यांनी पुन्हा रोखीने कर्ज वसुली द्यावी. त्यातील १६ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. बँक सोसायटीस कर्ज देते, सोसायटी शेतकरी सभासदांना कर्ज देते त्याचप्रमाणे सोसायटीच्या प्रतिनिधी यांनी व सचिवांनी वसुली करून बँकेस सहकार्य करावे अशी विनंती बँकेचे कार्यकारी संचालक पिंगळे यांनी केली.
जे शेतकरी सभासद सन २०२१-२२ या वर्षात ३ लक्ष रुपये पर्यंत कर्ज घेतील त्यांना महाविकास आघाडी शासनाने जाहीर केलेल्या ० टक्के व्याज योजनेचा लाभ निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा याकरिता शेतकऱ्यांना माहिती द्यावी तसेच थकीत शेतकऱ्यांनी जुने थकीत कर्ज भरून नवीन कर्ज घ्यावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या बैठकीच्या निमित्ताने केले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेचे ९२० कोटी रुपये महाविकास आघाडी शासनाने उपलब्ध करून दिले त्यामुळे काही प्रमाणात बँक सुरळीत सुरू झाली. कर्जवाटप करता आले त्याबद्दल शासनाचे हार्दिक आभार व्यक्त केले.
निफाड तालुक्यातील शेतकरी प्रामाणिक व कष्टकरी आहेत त्यांना बँकेने सहकार्य करावे. निफाड तालुक्यात झालेला वसूल तालुक्यातील नवीन पात्र सभासदांना नवीन कर्ज रूपाने वाटप करावा यापद्धतीने प्रत्येक सोसायटीच्या १५-२० नवीन शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. बँकेस शासनस्तरावरून मदत व सहकार्य व्हावे याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांना आमदार दिलीपराव बनकर यांनी विनंती केली . याप्रसंगी नंदू सांगळे,दत्तूपंत डुकरे, साहेबराव मोरे, माधवराव ढोमसे, बाबासाहेब शिंदे, बापू गडाख, संपतराव डुंबरे, सदाशिव खेलुकर आदींसह विविध सोसायट्यांचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सचिव उपस्थित होते.