पिंपळगाव बसवंत: कोरोना विषाणूचा सर्वत्र हाहाकार झाल्याने याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्यातील ब्रास बँड व्यवसायिकांना बसला आहे. सध्यस्थीतीत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात अनलॉक जाहीर करण्यात आला. शासन-प्रशासनाच्या अटी शर्थीचे पालन करून राज्यात लग्नसमारंभात ब्रास बँड वाजविण्यास परवानगी देण्याची मागणी ब्रास बँड असोसिएशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष रज्जाक शेख (शेख मास्टर) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच कोरोना विषाणूच्या महामारीने राज्यातील सर्व ब्रास बँड मालक व कलाकारांवर उपासमारीची वेळ ओढवली. २२ मार्च २०२० महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्याने एप्रिल व मे महिन्यात बँडच्या लग्नाच्या तारखा रद्द झाल्या. तसेच मार्च ते जून २०२१ पर्यंत या वर्षातील लग्नाच्या तारखाही देखील रद्द झाल्याने राज्यातील ब्रास बँड व्यवसायीकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात अनलॉक जाहीर झाल्याने सर्व व्यवसाय सुरळीत सुरू झाले असताना बँडचा व्यवसाय अजून सुरू झालेला नसल्याने बँड व्यवसायिक व कलाकारांवर हा एक प्रकारे अन्यायच असल्याने शासन-प्रशासनाच्या अटी शर्थीचे पालन करून चालू आर्थिक वर्षातील जुलै महिना ते दिवाळीनंतर राज्यात लग्नसमारंभात बँड वाजविण्यास परवानगी देण्याची मागणी बँड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.निवेदन देतांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा ब्रास बँड असोसिएशनचे सुकदेव मोटमल, राजू बिवाल, योगेश शिंदे, मेजर संतोष मेहंदळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.