ग्रामविकास मंत्र्याचे आदेश….आमदार दिलीप बनकर यांनी दिली माहिती
पिंपळगाव बसवंत: राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान राज्यस्तरावरुन उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना राबविणेकामी ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात बैठक संपन्न झाली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान राज्यस्तरावरुन उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना राबविण्याची मागणी आमदार दिलीप बनकर यांनी केलेली होती. त्यानुसार २५ -८-२०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये राज्यातील २५ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामोत्थान योजनेचा प्रस्ताव मंत्री मंडळापुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सदरचा प्रस्ताव हा इतिवृत्त निर्गमित झाल्यापासून १ ते २ महिन्यांच्या आत सादर करणेबाबत सुचित केलेले होते. मात्र सदरचा प्रस्ताव ग्रामविकास विभाकडे प्रलंबित असल्याने त्या अनुषंगाने आमदार दिलीप बनकर यांनी मंत्री, ग्रामविकास यांना पुनश्च बैठक आयोजित करणेबाबत २६.५.२०२१ रोजी पत्र दिले होते त्या अनुषंगाने आज ग्रामविकास मंत्री यांचे दालनात या संदर्भात बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये मोठ्या ग्रामपंचायतीना ग्रामपंचायत विभागात विकास कामे करण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी व लागणारा विकास निधी याबाबत चर्चा झाली असून मोठ्या ग्रामपंचायतीना जास्तीत जास्त निधी प्राप्त व्हावा याकरिता नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना सुरु व्हावी यासाठी तात्काळ सदर योजनेचा प्रस्ताव तयार करून मंत्री मंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात यावा असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीं संबधित विभागास दिले आहेत. सदर बैठकीस ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहसचिव मोहिते, उप सचिव गागरे, कार्यासन अधिकारी तेलवेकर, कार्यासन अधिकारी जाधवर यांचेसह पंढरीनाथ थोरे, डी.के. जगताप, राजेंद्र डोखळे आदी उपस्थित होते.