पिंपळगाव बसवंत: साकोरे फाट्यावर पुष्ट्याने भरलेल्या नादुरुस्त ट्रकला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने आगीत संपूर्ण पुष्टे जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
याबत अधिक माहिती अशी की, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील साकोरे फाट्यावर पुष्ट्याने भरलेल्या नादुरुस्त ट्रक क्रमांक एम एच ०५ १६११ ला मध्यरात्रीच्या सुमारास सॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. स्थानिकांनी तातडीने पिंपळगाव बसवंत अग्निशमन विभागास याबत माहिती दिली. अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची भीषणता अधिक असल्याने टोलनाक्याच्या क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक पलटी करण्यात येऊन दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे. यावेळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी अभिजीत काशिद, सुभाष बोंबले,बशीर शेख आदी उपस्थित होते.