पिंपळगाव बसवंत: कृषिवैभवाच माहेरघर असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत सारख्या ग्रामीण भाग आणि त्यात अंगी दडलेल्या कलागुणांमुळे कला-अभिनय क्षेत्रात पुढे आलेल्या सलमान तांबोळी या नवतरुण कलाकाराने मराठी अभिनय सिनेसृष्टीत टीव्ही मालिकेत दमदार कमबॅक केल आहे. मामा नाही ओ, दिर आहे मी! असं म्हणत कौटुंबिक नात्यांची केमिस्ट्री सांगणाऱ्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत सलमान दिराच्या भूमिकेत पहावयास मिळत असल्याने पिंपळगावकरांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब ठरत आहे.
अमित सावर्डेकर दिग्दर्शित तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मराठी मालिकेचे नाशकात चित्रकरण सुरू आहे. यात अभिनेत्री अमृता पवार, अभिनेता हार्दिक जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यांसह सलमान तांबोळी, प्रशांत गरुड, हेमंत देशपांडे, सी.एल.कुलकर्णी, सुरेखा शर्मा, रेखा सागवेकर, अंजली जोशी, चित्रा कुलकर्णी, निवास मोरे, पूनम देशमुख, अपर्णा क्षेमकल्याणी, अजय तारगे, प्रतीक पाटील, कोमल शेटे, अर्जुन कुमठेकर, राधिका झंकर, सुहानी नाईक आदी कलाकारांचा समावेश आहे.
पिंपळगाव बसवंत शहरातील नवतरुण कलाकार असलेल्या सलमान तांबोळी यांस बालपणापासून अभिनयाची आवड असल्याने त्यांनी शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना व्यवसायिक नाटकांपासून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. तांबोळी यांनी आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी, कन्यादान, क्राईम डायरी, लक्ष्य, घाडगे आणि सून, आदी मराठी मालिकेत काम केलं आहे. तर नाशकात नव्याने चित्रीकरण सुरू असलेल्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत दिराची भूमिका साकारत आहे. शिवाय चंदन पुरीचा खंडोबा, स्वामी, घुंगराच्या नादात, परतु, परफेक्ट प्लॅन, अट्टाहास, सनम तुझी कसम, वन फोर थ्री, गुठळी, जिंदगानी, महिमा आई जगदंबेच्या आदी मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.