पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील टेम्पो स्टँड समोर एका गॅस वेल्डींग दुकानात अचानक गॅस टाकीचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे. या भीषण स्फोटात दुकान मालक योगेश मधुकर विधाते हे गंभीररित्या भाजले गेल्याने त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अन्य एक युवक गॅस टाकी डोक्याला लागल्याने किरकोळ जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव शहरातील जुना आग्रारोडवरील टेम्पो स्टँड समोर विधाते गॅस वेल्डिंगचे दुकान आहे. या दुकानात बुधवारी दुपारच्या दरम्यान वेल्डिंगचे काम सुरू असताना गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला.या स्फोटात दुकान मालक योगेश मधुकर विधाते रा. मोरे नगर पिंपळगाव बसवंत यांचे हात पाय भाजले गेल्याने ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. तर गॅस टाकीचा स्फोट इतका भीषण होता की स्फोटात गॅस टाकी उडून थेट परिसरातील तीन दुकाने सोडून फेकली गेली. परिसरात उभ्या असलेल्या एकाच्या युवकाच्या डोक्याला या टाकीचा फटका बसल्याने तो युवकही किरकोळ जखमी झाला आहे.