पिंपळगाव बसवंत: दिवाळी तोंडावर येऊन ठेपल्याने एकीकडे कांदा दराने साडेचार हजारांचा पल्ला गाठला असताना दुसरीकडे आयकर विभागाने पिंपळगाव बसवंत शहरातील प्रतिष्ठित सहा कांदा व्यापाऱ्यांवर गुरुवार दि.२१ रोजी धाडी घातल्याने पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आयकर विभागाच्या पथकाने सकाळपासून शहरातील सहा प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या गोडावून, कार्यालय, आडत, निवासस्थाने आदी जवळपास १३ ठिकाणी आयकर विभागाच्या सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने झाडाझडती करण्यात आली. आयकर विभागाच्या वतीने कांदा खरेदीच्या पावत्या, कांद्याच्या विक्रीची बिले, आदींसह कर भरण्याबाबत कसून चौकशी केल्याचे समजते आहे. दुपारपर्यंत ही चौकशी सुरू होती. दरम्यान या धाड सत्रामुळे पिंपळगावच्या व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मात्र यात धाडीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती नेमके काय लागले यापेक्षा आयकरच्या या धाडसत्राने मात्र शहरातील कांदा व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
भाव पाडण्याचा डाव…..
पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे दर जवळपास साडे चार हजारांपर्यंत पोहचले आहे.शिवाय दिवाळीत कांदा दर वधारणार असल्याने कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी व भाव पाडण्यासाठी आयकर विभागाकडून छापमारीची ही खेळी खेळली जात आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याची भावना स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.