पिंपळगाव बसवंत: माझी वसुंधरा अभियानांतर्गत जलप्रदूषण रोखण्यासाठी आज अनंतचतुर्थी पार्श्वभूमीवर पिंपळगाव ग्रामपालिकेच्या माध्यमातून गणपती विसर्जनासाठी शहरात यंदा विविध ठिकाणी जवळपास पाच कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली आहे. खबरदारी व सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपळगावकरांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन कादवा नदी पात्रात न करता ग्रामपालिकेच्या कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन ग्रामपालिकेच्या सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर यांच्याकडून करण्यात आले आहेत.
पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने गणपती विसर्जनासाठी दरवर्षी कादवा नदी पात्रावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तराफा लावुन विसर्जनाची व्यवस्था केली जात होती. मात्र गतवर्षी गणपती विसर्जनावेळी ग्रामपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने यंदा खबरदारी म्हणून कादवा नदी पात्रात गणपती विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनाकडून पूर्णतः बंदी करण्यात आल्याने पिंपळगाव ग्रामपालिकेकडून शहरात गणपती विसर्जनासाठी चिंचखेडरोड, घोडके नगर, दगुनाना मोरे नगर, उंबरखेडरोड, पिंपळगाव टोलनाका परिसर आदी भागात गणपती विसर्जनासाठी कुत्रीम तलाव व कुंड उभारण्यात आले आहे याचा पिंपळगावकरांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कादवा नदीवर विसर्जनास बंदी
पिंपळगाव ग्रामपालिकेसह पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेखातर पिंपळगाव टोलनाक्याजवळील कादवा नदी पात्रावर आज होणाऱ्या गणपती विसर्जनास पूर्णतः बंदी घातल्याने गणेश भक्तांनी आपल्या बाप्पांचे विसर्जन शहरातील कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चोख बंदोबस्त असणार…..
पिंपळगाव कादवा नदीवर विसर्जनासाठी यंदा बंदी केली असल्याने पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नदी पात्र प्रवेश परिसराला बॅरिगेडिंग करण्यात येऊन चोख बंदोबस्त तैनात करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी दिली.