पिंपळगाव बसवंत: शहरातील महत्वाचा मानला जाणाऱ्या जुना आग्रा रोडवरील निफाड फाटा ते एसटी डेपोपर्यंतच्या रस्त्यावर पावसाने मोठं-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांवर खड्ड्यातून वाट काढत प्रवास करण्याची वेळ ओढवली आहे. शहरातील मुख्य रस्त्याची पावसाने अशी वाताहत झाल्याने आता तरी रस्ता दुरुस्ती करा, अन वाहनधारकांना दिलासा द्या! अशी आर्त हाक पिंपळगावकरांनी घातली आहे. जिल्ह्यातील महत्वाचे कांद्याचे आगर, द्राक्ष पंढरी, मिनी दुबई असे एक ना अनेक बिरुदे मिरवणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरातील वर्दळीचा असलेल्या जुना आग्रारोडवरील निफाड फाटा ते एसटी डेपो पर्यंतच्या रस्त्याची पावसाने गेल्या कित्येक दिवसापासून दुरवस्था झाली आहे. शिवाय चिंचखेडरोडवरील रस्त्याला मोठं मोठं भगदाड पडल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचा सुरू दिसून येत आहे. शहरातील रस्त्याची पावसाने दयनीय अवस्था झाल्याने दुर्लक्षित कारभाराचा फटका सर्वसामान्य पिंपळगावकर नागरिकांना सोसावा लागत असल्याने आता तरी रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने करण्याची मागणी वाहनधारकांकडून पुढे येत आहे.
चिंचखेडरोड देखील खड्ड्यात!
शहरातील दाट वस्ती असलेल्या चिंचखेडरोड मुख्य रस्त्याला चिंचखेड चौफुलीपासून ते थेट नंदनवन लोनसपर्यंत पावसाने मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत ठरवून खड्डेमय प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय!
पिंपळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उंबरखेडचौफुली ते थेट वणी चौफुलीपर्यंत सर्व्हिसरोडवर दोन्ही बाजूने मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना खड्डेमय प्रवास करावा लागत असल्याने याकडे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.
खड्डेमय रस्ते तरी, टोलवसुली!
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिसरोडची पावसाने पुरती दुरवस्था केली असताना पिंपळगाव टोलनाका प्रशासनाकडून मात्र रस्त्याचा कुठलाही दर्जा नसताना टोलवसुली केली जात आहे. हे नियमबाह्य नाही का असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.