पिंपळगाव बसवंत: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील उंबरखेड चौफुली, चिंचखेडचौफुलीसह वणीचौफुली परिसरातील सर्व्हिसरोडला पावसाने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने टॉमटो हंगामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसह वाहन धारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत असल्याने महामार्ग प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा शिवसैनिकांशी गाठ आहे असा कडक इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणास निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळगाव बसवंत शहरातील राष्ट्रीय महामार्गावरी सर्व्हिसरोडची पावसाने पुरती चाळण झाली आहे. उंबरखेड चौफुली ते वणी चौफुली परिसरातील सर्व्हिसरोडला मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाल्याने महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने शहरातील दोन्ही बाजूच्या सर्व्हिसरोडची तातडीने दुरुस्ती करावी.रस्ता तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसैनिकांशी गाठ आहे असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, निफाड तालुका सहसंपर्क प्रमुख किरण लभडे, शहर प्रमुख नितीन बनकर ,सागर झोमण, रुपेश शिंदे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.