नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : महिला व बालविकास विभागाच्या 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे यासह सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक शहरासाठी अशा 700 महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार असून पात्र महिलांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
पिंक (गुलाबी) ई-रिक्षासाठी करावयाचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक तसेच www.nashik.gov.in या संकेतस्थळावर , महानगरपालिका,नाशिक मुख्य कार्यालय व जवळच्या अंगणवाडी केंद्रात उपलब्ध आहेत.
*योजना लाभासाठी पात्रता व आवश्यक अटी-शर्ती
• लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
• अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रूपये 3 लाखांपेक्षा अधिक नसावे
• विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/ माजी प्रवेशिता तसे़च दारिद्यरेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
• ई-रिक्षा घेण्यासाठी ई-रिक्षा किंमतीच्या 70 टक्के रक्कम बँक कर्ज व 20 टक्के रक्कम राज्य शासन हिस्सा याप्रमाणे असून 10 टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वत: भरावयाची आहे.
• कर्जाची परतफेड लाभार्थीने 5 वर्ष (60 महिने) कालवाधीत करावयाची आहे.
• सदर योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येईल.
• लाभार्थी महिलेला पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा लाभार्थी महिलेने स्वत: चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे.
वरील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे सादर करावेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.