पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यात हजारोच्या संख्येने नवे बाधित दररोज आढळून येत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही अशीच स्थिती आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमधून एक चिंताजनक बाब समोर येत आहे. ती म्हणजे, गेल्या १० दिवसात येथील तब्बल एक हजार मुले कोरोना बाधित झाली आहेत. त्यामुळे सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांवर विशेष परिणाम करणारी ठरेल, असा इशारा दिला जात होता. त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील शाळा येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद केल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. शून्य ते १८ या वयोगटातील तब्बल १ हजाराहून अधिक मुले गेल्या १० दिवसात बाधित झाली आहेत. सद्यस्थितीत १५ वर्षे वयापुढील मुलांसाठीच लस उपलब्ध आहे. १५ वर्षे वयापेक्षा कमी मुलांसाठी लस नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० दिवसात ० ते ५ वयोगटातील १६६, ६ ते १८ वयोगटातील ८५७ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. या मुलांना अत्यंत सौम्य लक्षणे आहेत. तर, लहान मुलांचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. महापालिकेच्या नव्या जिजामाता रुग्णालयात केवळ चारच मुलांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. उर्वरीत मुले ही घरातच विलगीकरणात आहेत.