पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राप्रमाणेच विविध राज्यांमध्ये धर्म प्रसाराचा प्रकार घडत आहे. पिंपरी-चिंचवड येथेदेखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार, एक व्यक्ती घरात घुसून जबरदस्तीने बायबलचे वाचून दाखवायची. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.
पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये धर्म प्रसाराचा प्रकार समोर आला आहे. ख्रिश्चन समाजाच्या तीन महिलांवर धर्म परिवर्तन करत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वाकड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. तर आम्हाला मारहाण करण्यात आली अशी परस्परविरोधी तक्रार या महिलांनी ही केली आहे. रहाटणी परिसरातील एका कुटुंबाच्या घरी या महिला जायच्या आणि त्यांना बायबल वाचून दाखवायच्या. बायबलचा अर्थ समाजवताना त्या आमचे मनपरिवर्तन करत होत्या.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, बायबल वर विश्वास ठेवा, असं म्हणत त्या धर्म परिवर्तन करण्याचा ही प्रयत्न करत असल्याचा आरोप त्या कुटुंबाने या तिन्ही महिलांवर केला आहे. काल हा प्रकार समोर आल्यावर वाकड पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूट कामटे, पूजा कलाल, चांदणी राठोड अशी त्यांची नावं आहेत. या तिघी मोलमजुरी करतात आणि रिकाम्या वेळेत बायबल वाचून प्रबोधन करत असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. या तिन्ही महिलांनी ही त्यांना मारहाण केल्याची तक्रार केलेली आहे.
तीन महिलांचा हात
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे हा सगळा प्रकार तीन महिला करत होत्या. त्या काही दिवसांपूर्वी रहाटणी परिसरातील एका कुटुंबाच्या घरी गेल्या आणि त्यांना बायबल वाचायला सांगितलं. त्यावेळी घरात असलेल्या महिलांनी त्यांना नकार दिला आणि घरातून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा या महिला घरात शिरल्या आणि त्या घरातील मुलांनादेखील वाचायला सांगितलं. त्यावेळी देखील त्यांनी बायबल वाचायला विरोध केला असता त्यांनी पुन्हा एकदा येशूचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या.