पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. कारण महापालिकेत एक-दोन नव्हे तर तब्बल १६ हजार ८३८ पदांसाठी मेगाभरती होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे.
महापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले. वरील पदासांठीती मे महिन्यामध्ये परीक्षा होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
म्हणून पदभरती
जुना आकृतिबंध तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात तयार झाला होता. त्याला राज्य शासनाने मंजुरीही दिली होती. मात्र, नोकरभरतीस बंदी असल्याने तसेच कोरोना महामारीमुळे ती पदे भरता आली नाहीत. केवळ वैद्यकीय, आरोग्य तसेच अत्यावश्यक विभागातील नोकर भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे ११ हजार ५१३ पैकी केवळ ७ हजार ५३ पदे सध्या कार्यरत होती. अशात कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने ही पदभरती करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी महापालिकेच्या खालील वेबसाईटला भेट द्या
https://www.pcmcindia.gov.in/marathi/
Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC 16 Thousand Post Recruitment