पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी-चिंचवड परिसरात चार वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत या मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे. या अपहरणप्रकरणी एका ४२ वर्षांच्या व्यक्तीसह त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. जुन्नरमध्ये पोलिसांनी अटकेची कारवाई केली असून सध्या त्यांची चौकशी केली जाते आहे.
शनिवारी दुपारी चार वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. मुलगी कुठेच सापडत नसल्याने नातलगांना शंका आली आणि त्यांनी लगेचच पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मुलीचं अपहरण झालं असल्याचं निष्पन्न झालं. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अवघ्या काही तासांच्या आत मुलीची सुटका केली आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी या चार वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं, याचा आता शोध घेतला जात आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस अधिकारी अंकुश शिंदे यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, या अपहरणामागे काय हेतू होता याचा तपास पोलिसांकडून केला जातो आहे. दरम्यान, चार वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी लगेचच गंभीर पावले उचलली. आता या मुलीला सुखरुप पुन्हा तिच्या नातलगांकडे सोपवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमधील क्राईम ब्रांच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी चिखलीमध्ये राहत होती. संशयित आरोपी असलेल्यांनी या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमीष दाखवलं आणि तिला बाहेर आणलं. त्यानंतर तिचं अपहरण करुन ते जुन्नरला पळून गेले.
मुलीची सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही ती सापडली नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला मुलीला घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. या महिलेचा शोध घेत पोलिसांनी अखेर जुन्नर गाठत महिलेला अटक केली. या महिलेसह तिच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे.
Pimpri Chinchwad Crime 4 year old girl kidnap