पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. याठिकाणी नाना काटे यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यात लढत होणार आहे.
कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.
भाजपच्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज कालच भरले आहेत. कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार नसल्याचे भाजप नेत्यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही. तर लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबतीलच सदस्य असलेल्या आणि जगताप यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
चिंचवडची जागा शिवसेनेला लढायची होती. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने या जागेचा हट्ट सोडला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या दोन्ही जागांची निश्चिती करण्यात आली. कब्याची जागा काँग्रेस तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादीच्यावतीने राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि आज सकाळीच राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
राहुल कलाटे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होतानाच बंडखोरी हेण्याची भीती होती. त्यामुळे स्वतः अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी रात्री उशीरापर्यंत चर्चा केली. तसेच, कलाटे आणि काटे यांची एकाचवेळी बैठक घेऊन अखेर काटे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Pimpri Chinchwad By Poll Election NCP Candidate Declared Politics