नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक ग्रामीण पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच एक मोठी कामगिरी केली होती. त्यात अपहरण करुन लहान मुलींची परराज्याच विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. ओझर येथील दोन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या तपासात ही बाब निष्पन्न झाली होती. आताही धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील दोन बेपत्ता विद्यार्थिनी मनमाड येथए सापडल्या आहेत.
नाशिक शहर व परिसरातील विविध भागांतून गेल्या दीड वर्षात सुमारे ५४ मुले बेपत्ता झाली आहेत. त्यात अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांश अल्पवयीन मुली प्रेमप्रकरणाच्या आमिषाला बळी पडून बेपत्ता झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत म्हणजेच नाशिक शहरात अल्पवयीन मुले-मुली पळून जाण्याचे किंवा नेण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी ३७, तर यंदा १७ अशा दीड वर्षात ५४ घटना उघडकीस आल्या आहेत. अल्पवयीन पळून गेलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातच पिंपळनेरच्या दोन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.
अक्कलकुवा येथील एका विद्यालयातील मुली या नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथे कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी आल्या. तेथून त्यात परतत असताना पिंपळनेर बसस्थानक येथून या दोन्ही विद्यार्थिनी बेपत्ता झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी घडली. त्यानंतर तातडीने पिंपळनेर पोलिस स्टेशनमध्ये त्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. अखेर या विद्यार्थिनी मनमाड रेल्वे पोलिसांना सापडल्या आहेत. यासंदर्भात आता पोलिसांनी सर्व माहिती दिली आहे.
अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथील एका विद्यालयाच्या मुला व मुलींच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथे या स्पर्धा होत्या. शिक्षकांसह हे काही विद्यार्थी व विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. स्पर्धा आटोपून अक्कलकुवा येथे परतीसाठी शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी वडाळीभोई-नंदुरबार या एसटी बसने ते सर्व निघाले. बसमधून दोन विद्यार्थिनी व शिक्षिका लघुशंकेसाठी खाली उतरल्या. परत बसमध्ये बसले असता शिक्षकांनी बसमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या मोजली, तेव्हा दोन विद्यार्थिनी कमी आढळल्या. त्यांचा तातडीने बसस्थानक परिसरात शोध घण्यात आला.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराही तपासण्यात आला. सटाणा रस्त्यावर तसेच गावात, बाजारपेठेत व इतर ठिकाणी शोध घेण्यात आला. दिवसभर त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. पोलिसांच्या मदतीनेही शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी तपासाला गती दिली.
विद्यार्थिनींचे फोटो पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविण्यात आले. तसेच नजिकच्या सर्वच पोलीस ठाण्यांशी संपर्क साधण्यात आला. रेल्वे पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला. अखेर या दोन्ही विद्यार्थिनी मनमाड रेल्वे पोलिसांना आढळून आल्या. ताब्यात घेऊन दोन्ही विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मनमाड रेल्वे पोलिस आणि पिंपळनेर पोलिस यांनी एकमेकाशी संपर्क साधला. साळुंखे यांनी पोलिसांचे पथक पाठवून त्या विद्यार्थिनींना पहाटे शिक्षकांकडे सुपुर्द केले आणि शिक्षकांचा जीव भांड्यात पडला.. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. तसेच शिक्षकांनी देखील या घटनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
Pimpalner Girl Student Missing Found Police Investigation
Nashik Crime Manmad Railway Police