पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पिंपळगावमध्ये माथाडी हमाल कामगार संघटनेच्या पगाराची रक्कम असलेल्या १५ लाख रुपयांची लूट झाल्याचा बनाव करणाऱ्या सेक्रेटरी राकेश दिलीप बाविस्कर याच्या विरोधात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे की, नोव्हेंबर २०२४ पासून राकेश बाविस्कर युट्यूबवरील ‘Mehta is Bank’ या चॅनेलवर शेअर मार्केट व अँटीक नोटांची खरेदी-विक्री संबंधित व्यवहारांमध्ये गुंतला होता.
यामध्ये ५०० रुपयाच्या ७८६ नंबर असलेल्या नोटेला २० लाख रुपये व १०० रुपयाच्या खास सिरीयल असलेल्या नोटेला १ लाख रुपये मिळणार, असे आमिष त्याला दाखवण्यात आले.
@Dilip 4006 या युट्यूब चॅनेलवरील दिलीप कुमार आलेंशी ‘Crime India Cell’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. संस्थेचे सदस्य पिंपळगाव बसस्थानक गेटवर भेटले आणि फसव्या व्यवहारात आरोपीने ९ लाख ५० हजार रुपये दिले. यात ५ लाख रोख, त्यानंतर २ लाख + २ लाख अशा टप्प्याटप्प्याने रक्कम दिली .संस्थेने सांगितले होते की, “तुमचं आयडी मॅच झाल्यावर आमचे लोक येतील आणि तुम्हाला पैसे खात्यात जमा करून देतील.” मात्र तसे काही न घडल्याने, बाविस्कर याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या व्यवहारात आपले पैसे गेल्यामुळे त्याने कामगारांच्या १५ लाख रुपयांच्या पगाराची लूट झाल्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे, सीसीटीव्ही फूटेज व सखोल चौकशीत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
पोलिसी तपास व पुढील कारवाई
सदर गुन्ह्याचा तपास करताना पिंपळगाव पोलिसांनी आरोपीकडून सात नोटा जप्त केल्या आहेत. आरोपीने मेहता व ममता कंपनीशी संपर्क साधल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून, त्या संस्थेची पार्श्वभूमी तपासली जात आहे.बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीस ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करत आहे.