पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – रानमळा लोणवाडी शिवारात धारदार शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा चोरट्यां पैकी तीन सराईत चोरांना पकडण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना यश आले आहे. तिन्ही आरोपींकडून एक मोबाईल, चोपर, गज, मिरचीची पूड, वेळूच्या काठ्या, नायलॉन दोरी, कोयता आदी ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव शहरात दि.२३रोजी मध्यरात्री पो कॉ नितीन जाधव, संदीप दराडे, मिथुन घोडके आदी मोटरसायकलवर गस्त घालत होते. पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे यांना मध्यरात्रीच्या सुमारास रानमळा लोणवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत काही चोरटे धारदार शस्त्र घेऊन वावरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मध्यरात्री साडे ३च्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांसह घटनास्थळी उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, पो को तुषार झालटे, शांताराम निंबकर, राकेश धोंडगे, यांनी धाव घेतली. पोलिसांना बघून काही आरोपींनी पळ काढला. त्याचवेळी पाठलाग करून आरोपी मोहित भास्कर गांगुर्डे, मुकुंद गणपत देशमुख, रोहित केशव गायकवाड आदींना पकडण्यात यश आले. तर पलायन केलेल्या आरोपी मुज्या उर्फ दानिश सरफराज शेख, बापू उर्फ प्रतीक पांडुरंग मातेरे, भूषण उर्फ स्वप्नील सुनील गोसावी आदींवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉ नितीन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांकडून ११ हजारांचा मोबाईल, लोखंडी धारदार चोपर, तीन फूट लांबीचा गज, मिरची पूड पाकीट, लोखंडी पात्याचा कोयता, वेळूच्या काठ्या, नोयलॉन दोरी आदी ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहे.