नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळीच सुरू झाली आहे. थेट सरपंचपदाची निवड मतदारांमधून होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांना मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर बनकर यांची निवड झाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दुस-या टप्प्यातील १९६ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यानंतर रविवारी १८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. आज या निवडणुकीचे निकाल हळूहळू आता येऊ लागले आहे. थेट सरपंच पदासाठी व सदस्यांच्या निवडीसाठी अनेक गावांमध्ये मोठी चुरस असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भास्कर बनकर हे विजयी झाले आहेत.
इतकी मते मिळाली
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीत भास्कर बनकर यांना ८ हजार ३३५ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार सतीश मोरे यांना ८ हजार १२२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश बनकर हे तिस-या क्रमांकावर गेले आहे. त्यांना ६ हजार ३ मते मिळाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने १० वर्षाची सत्ता गमावली आहे. प्रतिष्ठेची ठरलेल्या पिंपळगाव बसवंत निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार हे आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे आहेत. त्यांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे.
Pimpalgaon Basawant Grampanchayat election Result