नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बसवंत शहरात मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी हॉटेल्सचे मोठे नुकसान केल्याची बाब समोर आली आहे. या हॉटेल्सला आग लावण्याबरोबरच काही वाहनांचेही नुकसान झाल्याचा प्रकारही पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. या दुर्घटनेमुळे गावात मोठी दहशत पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील जुना आग्रा महामार्गावर चेतन कायस्थ यांचे हाॅटेल आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांचे हाॅटेल फोडण्यात आले. तसेच या हाॅटेलला आग लावण्यात आली. ही बाब समजताच शेजारच्या हाॅस्पिटलमधील डाॅ. यशपाल सोनवणे यांनी तात्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हॉटेली रचना लाकडाची असल्याने संपूर्ण हॉटेल बेचिराख झाले. या हॉटेल लगत असलेली काही दुकाने मात्र बचावली. याच ठिकाणापासून काही अंतरावर असलेली एक दुचाकीही जाळण्यात आली. तसेच दगु नाना नगरमधील चार वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. हा सर्व प्रकार मध्यरात्री झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.