इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दोन महिन्यांपूर्वी डुकराचे हृदय माणसाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याची जगातील पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्या व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया झाली, ते डेव्हिड बेनेट यांचा मेरीलँड वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळले नसले तरी, काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत चालली होती, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, त्यांच्या शरीराने बाहेरील अवयव नाकारणे सुरू केले होते की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्या मृत्यूचे कोणतेही स्पष्ट कारण समजू शकले नाही. सुरुवातील बेनेट यांच्या शरीरात डुकराचे हृदय काम करत होते. बेनेट हळूहळू बरे होत आहेत याबद्दल मेरीलँड रुग्णालयाने वेळोवेळी ताजी माहिती दिली होती.
गेल्या महिन्यात रुग्णालयाकडून त्यांचा व्हिडिओ जारी करण्यात आला होता. त्या वेळी ते फिजिकल थेरेपिस्टसोबत रुग्णालयाच्या खाटेवर पडून फुटबॉलच्या सामन्याचा आस्वाद घेत होते. बेनेट यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. बर्टले ग्रिफिथ म्हणाले, की बेनेट यांचा मृत्यू झाल्याने आम्ही सर्व जण दुःखी आहोत. त्यांनी स्वतःला एक धाडसी रुग्ण सिद्ध करून शेवटपर्यंत लढा दिला. मेरीलँड येथील रहिवासी डेव्हिड शस्त्रक्रियेपूर्वी म्हणाले होते की, माझ्याकडे दोन पर्याय होते. मृत्यू स्वीकारणे किंवा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेणे. मला जगायचे आहे. ही अंधारात बाण मारल्यासारखी स्थिती आहे हे मला ठाऊक आहे. परंतु ही माझी अखेरची इच्छा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डेव्हिड खाटेवर पडून मृत्यूशी झुंज देत होते.
प्रत्यारोपण करण्यापूर्वी डॉक्टरांनी डुकराच्या हृदयाची जीन-एडिटिंग करत त्याच्या पेशीधून तीन जीन काढून घेतले. यामुळे मानवी शरीर प्राण्याच्या अवयवाचे प्रत्यारोपण स्वीकारत नाही. तसेच डुकराच्या हृदयाकील पेशींच्या विकासासाठी आवश्यक जीन काढण्यात आले. रोगप्रतिकारक शक्ती स्वीकारणारे सहा मानवी जीन लावण्यात आले होते.