पिंपळगाव बसवंत: जागतिक महामारी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व निफाड तालुक्यातील व पिंपळगाव बसवंत शाळा व महाविद्यालयीन शैक्षणिक संस्थामध्ये फक्त ऑनलाईन शैक्षणिक कार्य सुरू असतानाही अनेक संस्थानी फी वाढ केली आहे. ती त्वरीत कमी करावी व फीमध्ये कमीतकमी १० टक्के सुट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथील तलाठी राकेश बच्छाव यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटल्या प्रमाणे कोरोनाची भयंकर जागतिक साथ सुरू असून त्यामुळे लाखो नागरिक बळी ठरले आहे. कोरोनाच्या संसर्गाला हद्दपार कसे करावे यांचा प्रयत्न प्रशासन करत आहे. माणूसकीच्या नात्याने जो तो मदतीचा हात पुढे करत आहे. शाळा बंद असल्याने शाळेतील विविध विषयांच्या प्रयोगशाळा, संगणकाचे प्रशिक्षण,विविध उपक्रम,शाळेचे मैदान, ग्रंथालय अशा वैविध्यपूर्ण शिक्षणापासून विद्यार्थी वर्ग संध्या वंचित आहे. तरी देखील शाळा व महाविद्यालयाने फी वाढ करून विद्यार्थी वर्गाला अडचणीत आणत आहे. शाळा, महाविद्यालयांनी वाढीव फी कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रसंगी मनसे जिल्हा संघटक संजय मोरे, मनसे विद्यार्थी सेना निफाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, मनसे उपतालुका अध्यक्ष सतिश पाटिल,मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष नितिश झूटे, सरचिटणीस निलेश सोनवणे ,आकाश काठे,पियुष पाटील,,ॠतिक बनकर,सुमित जाधव आदी मनसे सैनिक उपस्थित होते.