नाशिक – वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची ओळख सांगून कुणाला ब्लॅकमेल करीत असाल तर सावधान. तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. मनमाडच्या हुडको कॉलनीत राहणाऱ्या कैलास बाबासाहेब टेमगिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अँटी करप्शन ब्युरोकडून (एसीबी) कसून चौकशी सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कैलास टेमगिरे हा व्यापारी असून त्याने पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे आणि डीवायएसपी साळवे यांच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. म्हणूनच त्याने एका व्यक्तीला मदत करण्यासाठी आणि टँकरचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी एका व्यक्तीकडे तब्बल अडीच लाख रुपयांची लाच मागितली. संबंधित व्यक्तीने ताबडतोब एसीबीशी संपर्क साधला. यासंदर्भात एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात तो अडकला आणि अडीच लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे सिद्ध झाले. त्याची तत्काळ दखल घेत एसीबीने टेमगिरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, कुणी लाच मागत असल्यास किंवा देत असल्यास माहिती द्यायची असल्यास एसीबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधिक्षक दिनकर पिंगळे यांनी केले आहे.