मुंबई – भारतातील नागरिकांचा सोन्यावर प्रचंड विश्वास आणि प्रेम आहे. गुंतवणुकीसाठी आणि अलंकार म्हणूनही भारतीय सोन्याकडे आकृष्ट होतात. त्यामुळेच प्रत्येक घरात थोडेथोडके का होईना सोने असतेच. मग, ते अलंकाराच्या रुपात असो की अन्य कुठल्याही. आता सरकार या सोन्याबाबत एक निर्णय घेऊ सकते. याचसंदर्भात एक महत्त्वाचे वृत्त आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी देशात सुवर्ण बँकेची (गोल्ड बँक) स्थापना करण्याचा सल्ला दिला आहे. नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरात सोने पडून आहे. या सोन्याचा काहीही उपयोग होत नाहीये. सुवर्ण बँकेमुळे या सोन्याद्वारे कमाईमध्ये मदत मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
आर. गांधी म्हणाले, देशातील अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी सोन्याचे यशस्वीरित्या मुद्रीकरण करायचे असेल, तर दागिन्यांच्या रूपात घरामध्ये सोने ठेवण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. एका अंदाजानुसार भारतातील घरांमध्ये आणि धार्मिक संस्थांकडे जवळपास २३ ते २४ हजार टन सोने आहे. परंतु नागरिकांनी मानसिकता बदलणे सोपी गोष्ट नाहीय.
गांधी म्हणाले, सुवर्ण बँकेच्या संकल्पनेला पुनर्जीवित करायची ही योग्य वेळ असू शकते. सुवर्ण बँक म्हणजे अशी बँक जी सोने स्वीकारून सोन्यावर कर्ज प्रदान करेल. भारतासारखी अर्थव्यवस्था सलग वाढ होण्यासाठी खूपच जास्त पैशांची गरज आहे. सुवर्ण बँकेच्या स्थापनेसाठी बँक परवाना धोरणांसह काही नियामकीय सुविधांची गरज आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये देशात सोन्याकडे चला या धोरणांतर्गत एक उल्लेखनीय बदल दिसून आला आहे. त्याअंतर्गत नागरिकांना भौतिक सोन्याच्या तुलनेत आर्थिक सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे, नागरिकांकडे अससेल्या सोन्याच्या मुद्रिकरणासाठी प्रयत्न करणे, गुणवत्ता नियंत्रणासाठी पायाभूत सुविधा तयार करणे इत्यादी पावले उचलण्यात आली आहेत. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या आर्थिक उत्पादनांमध्ये सुवर्ण जमा, सुवर्ण धातू कर्ज, सुवर्ण बाँड आणि गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) यांचा समावेश आहे.