इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आजार वाढले तसेच त्यावरील उपायही वाढले आहेत.. एकाच आजारावर शेकडो प्रकारचे औषधे उपलब्ध असल्याने नागरिकांना त्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता देखील वाढती आहे. याच गरजेतून एकलहरे येथील मातोश्री फार्मसी महाविद्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनिनी इंटरॅकमेड अॅप तयार केले असून नागरिकांना गोळ्या औषधांचे उपयोग व दुष्परिणाम सहजपणे समजू शकणार आहे.
नागरिकाना आपल्या आजारांवरील विविध प्रकारचे औषधे व त्यासोबत घेतला जाणारा विरुध्द आहार तसेच त्यापासून होणारे चांगले व वाईट परिणाम या विषयी हे अॅप माहिती देणार आहे.या अॅपमुळे ज्याना औषधाबद्दल किंचितही माहिती नसते ते या अॅपद्वारे जागरूक होऊ शकता. हा विषय आयुष्मान भारत योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे, ज्यामध्ये डिजिटल हेल्थ आणि टेलिमेडिसिनद्वारे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे.औषधांच्या चुकीच्या सवयी आणि एकत्र वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे अॅप फार उपयोगी ठरू शकते. या अॅपमध्ये ३३ प्रमुख औषधांची माहिती, भारतीय ब्रँड नावे व ५०० हून अधिक परस्परसंवाद, परस्परसंवादाची तीव्रता तसेच मराठी आणि हिंदी भाषांमध्ये स्पष्टीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात c.nspl.space या लिंक वर हे ॲप उपलब्ध असून सामान्य वापरकर्त्यांसाठी सुलभ,इंटरफेस आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणाली यामुळे हे अॅप वैद्यकीय क्षेत्रात एक उपयुक्त साधन ठरणार आहे.या अभिनव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले यांच्या मार्गदर्शनाखाली आयेशा आलम, तृप्ती आहेर,सोनाली आघाव,गायत्री आहिरे या विद्यार्थिनीनी संयुक्तपणे हे अॅप विकसित केले असून या अॅपचे महाविद्यालयात सादरीकरण झाले.यासाठी या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करून या नाविन्यपूर्ण अॅपला विशेष पसंती मिळाली आहे.
महाविद्यालयात शिकत असतानाच अंतिम वर्षातील या विद्यार्थिनींनी केलेले हे संशोधन कौतुकास पात्र असून भविष्यात इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरेल असे संस्थेचे सचिव कुणाल दराडे यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक करून भविष्यातील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष तथा शिक्षक आमदार किशोर दराडे,संचालक रामदास दराडे,रुपेश दराडे आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्ले स्टोअर वरही हे ॲप
“मातोश्री फार्मसी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात स्वतःला सक्षम बनविण्यासाठी मार्गदर्शन करते. महाविद्यालयात विविध तज्ञांची व्याख्यान, फार्मसी कंपन्यांना भेट तसेच कॅम्पस मुलाखतीचेही आयोजन केले जाते.या विद्यार्थिनींनी कौशल्यपूर्वक तयार केलेल्या या अँपमुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.लवकरच प्ले स्टोअर वरही हे ॲप उपलब्ध होईल.”
-डॉ.गोकुळ तळेले,प्राचार्य, मातोश्री फार्मसी महाविद्यालय,एकलहरे