– अमोल पाटील, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
आधीच कोरोनामुळे २ वर्ष ऑनलाईनमध्ये घालवलेल्या विद्यार्थ्यांना सध्याचा काळ कोरोनाकाळापेक्षा भयंकर वाटू लागला आहे. कारण आहे, रखडलेली फार्मसी प्रवेश प्रक्रिया. राज्यशासनाचे लक्ष नसलेल्या या प्रक्रियेत मात्र बिचारा विद्यार्थी भरडला जात आहे. औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेलीच आहे. तर दुसरीकडे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश अर्जासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. यामुळे विद्यार्थी, पालक व कॉलेजही मेटाकुटीला आले आहेत.
डी. फार्मसी या पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, मुदतवाढीमुळे पुढील प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम असलेल्या डी. फार्मसीला प्रवेश दिला जातो. एकीकडे दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असून वर्गही सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे डी. फार्मसीची प्रक्रिया मात्र खोळंबली आहे. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची दुसऱ्या फेरीची प्रक्रिया आटोपत आलेली असताना, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही ठप्प आहे.
प्रवेश क्षमता मान्यतेच्या गोंधळामुळे प्रवेश प्रक्रिया खोळंबल्याची स्थिती असून विद्यार्थी व पालक मेटाकुटीला आले असून, प्रवेश प्रक्रियेपुढील ग्रहण संपणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपूर्ण राज्यभरातून लक्षवेधी पद्धतीने विद्यार्थी व पालक यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि माझ्याकडे सातत्याने तक्रार करत आहेत. याच अनुषंगाने आम्ही तंत्रशिक्षण संचालनालयास इशारा दिला आहे की, फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा गुंता त्वरित सोडवा अन्यथा प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करेल.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. बहुतांश शिक्षणक्रमांची प्रवेशाची दुसरी फेरी सुरू आहे. परंतु औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमांना नोंदणीसाठी सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. पदविका (डी.फार्मसी) आणि पदवी (बी.फार्मसी) या अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढलेली आहे. नोंदणीनंतर प्रारूप गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर कॅप राउंडची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशात आणखी विलंब झाल्यास प्रवेश निश्चि्तीच्या प्रक्रियेला थेट २०२३ उजाडेल. त्याचबरोबर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रवेश प्रक्रिया राबवावी. दरम्यान प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत असल्याने औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांवर संक्रांत येण्याची सुद्धा शक्यता आहे.
प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती पूर्ण होण्यात किमान एक महिना जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र थेट नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता असून, पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा फटका असणार आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम सहा ते आठ महिन्यांत उरकण्याची वेळ महाविद्यालयांवर येणार असून, याचा परिणाम थेट शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे थिअरीचा भाग ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केला जात होता. तसेच महाविद्यालये सुरू झाल्यानंतर प्राधान्याने प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला होता. यंदा प्रवेश प्रक्रियाच झालेली नसल्यामुळे, या विद्यार्थ्यांना करोना काळापेक्षाही अधिक नुकसान सोसावे लागणार आहे. ॉ
‘पीसीआय’ आणि महाविद्यालयामध्ये होत असलेल्या या दिरंगाईत केवळ विद्यार्थी भरडला जात आहे. वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने प्रारूप गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादीसह कॅप राउंड फेऱ्यांचे वेळापत्रकही जाहीर होऊ शकलेले नाही. तर बी. फार्मसी या पदवी अभ्यासक्रमासाठीही वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने पदविका अभ्यासक्रमानंतर पदवी अभ्यासक्रमांचेही प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यासाठी अजूनही दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे यंदाही शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रथम सत्र व द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. यापूर्वी प्रत्येक शैक्षणिक वर्षात दिवाळीनंतर प्रथम सत्र संपून परीक्षांची सुरु होत असते. परंतु औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची अद्याप प्रवेश प्रक्रियाच सुरु झालेली नाही. अशात ही प्रक्रिया पूर्ण करून प्रथम व द्वितीय असे दोन्ही सत्रांचे अध्ययन शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्राध्यापकांसमोर असणार आहे.
जागा कमी झाल्यावरून सुरू असलेल्या ‘पीसीआय’ आणि महाविद्यालयांच्या प्रकरणात फार्मसी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले देशभरातील लाखो विद्यार्थी भरडले जात आहेत. प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे शैक्षणिक वर्षाचे नियोजन तर कोलमडणार आहेच, परंतु जागा कमी झाल्यास पुढच्या वर्षी फी वाढवून महाविद्यालये आपला आर्थिक तोटा भरून काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदल्या वर्षाच्या महाविद्यालयाचा एकूण खर्च भागिले विद्यार्थी संख्या, या सूत्राप्रमाणे महाविद्यालये पुढील वर्षाच्या फी मंजुरीसाठी शुल्क नियमन प्राधिकरणाकडे (एफआरए) प्रस्ताव दाखल करीत असतात. यंदा कमी जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविल्यास पुढील वर्षात आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालये फी मध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारात नुकसान मात्र विद्यार्थ्यांचे होणार आहे.
यासर्व गोष्टींचा सारांश बघता, पीसीआय ने अयोग्य वेळी अवलंबलेल्या अयशस्वी धोरणांचा व राज्यशासनाच्या उदासीनतेमुळे सी.ई.टी. सेल व तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे फार्मसी प्रवेश प्रक्रियेस लावलेल्या ग्रहणास त्वरित थांबवले नाही तर राज्यव्यापी आंदोलनास सामोरे जाण्याची तैयारी यासर्व घटकांनी ठेवावी.
Pharmacy Admission Process Delay in Maharashtra