इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळ पॉप्युलर फ्रंट (पीएफआय) चे नेते याहिया तंगल यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे अंतर्वस्त्र भगवे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला असून, कारवाईची मागणी केली आहे.
अलाप्पुझा येथे झालेल्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते बोलताना दिसत आहे. तंगल सांगतात, “माझ्या अलाप्पुझा येथे झालेल्या सभेतील घोषणाबाजी ऐकून न्यायालयाचे न्यायाधीश आता आश्चर्यचकित होत आहेत. याचे कारण तुम्हाला ठाऊक आहे का? कारण त्यांचे अतर्वस्त्र भगवे आहे. ते भगवे असल्याने वेगाने उष्ण होतील. तुम्हाला त्याचा हेवा वाटेल आणि त्रासही होईल.”
अलाप्पुझामध्ये झालेल्या पीएफआयच्या सभेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा घोषणाबाजी करताना दिसत आहे. तो, “हिंदूंनी आपल्या अंत्यसंस्कारासाठी तांदूळ ठेवला पाहिजे आणि ख्रिश्चनांनी आपल्या अंत्यसंस्कारासाठी ऊन ठेवले पाहिजे. तुम्ही सभ्यपणे राहणार असाल, तर आमच्या भूमीत राहू शकता. जर तुम्ही सभ्यपणे जगणार नसाल तर आम्हाला स्वातंत्र्य ठाऊक आहे. सभ्यपणे, सभ्यपणे, सभ्यपणे जगा.” असे म्हणत आहे.
केरळमध्ये राहणाऱ्या हिंदू आणि ख्रिश्चन नागरिकांसाठी ही कृती धोका असल्याचे मानले जात आहे. पीएफआयने इशारा दिला होता की, ते जर रांगेत येणार नसतील तर त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल. केरळ पोलिसांनी शुक्रवारी पीएफआयच्या घोषणाबाजीच्या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे.
दरम्यान, अलाप्पुझामध्ये २१ मे रोजी झालेल्या सभेतील प्रक्षोभक घोषणाबाजी प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. तत्पूर्वी पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. मोहम्मद बशीर म्हणाले, की ही घोषणाबाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध करण्यात आली होती. आमचा पक्ष आरएसएसच्या दहशतवादाविरुद्धचा लढा सुरूच ठेवेल, असे ते म्हणाले.