मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव मधील पीएफआय या संघटनेच्या शहरातील टेन्शन चौकात असलेल्या पत्रावजा कार्यालयात दुपारी पोलिस व महसूल विभागाने पुन्हा एकदा झाडाझडती घेत तेथून काही कागदपत्र ताब्यात घेतली. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करीत अखेर त्या कार्यालयाला पंचांच्या समक्ष पोलिसांच्या उपस्थितीत सील करण्यात आले. या बंद कार्यालयावर प्रतिबंधित नोटीस तेथे चिकटविण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तेथे ठेवण्यात आला होता. पीएफआय या संघटनेच्या देशभरातील प्रमुख नेत्यांची धरपकड झाल्यानंतर या संघटनेवर अखेर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातल्यानंतर मालेगावमध्ये ही कारवाई करण्यात आली.