मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंधनदरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना केंद्र आणि राज्य सरकारने इंधनावरील करकपात करून दिलासा दिला आहे. परंतु या निर्णयाविरोधात पेट्रोलपंपचालक आक्रमक झाले असून, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने इंधनावरील करकपात केल्याचा आरोप फामपेडा या पेट्रोलपंपचालकांच्या संघटनेने केला आहे. याविरोधात येत्या ३१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय फामपेडाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कोणतेही नियोजन न करता हा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोलपंपचालकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. या निर्णयावर देशभरातील पेट्रोलपंपचालक नाराज असून ३१ मे रोजी ‘नो पर्सेस’ म्हणजेच इंधनाची खरेदी करणार नसल्याचे ठरवले आहे.त्या दिवशी ते आदल्या दिवशीच्या शिल्लक साठ्याची विक्री करणार आहे. या आंदोलनात देशभरातील पेट्रोलपंपचालक सहभागी होणार आहेत, अशी माहिती फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. फामपेडाच्या या निर्णयामुळे ३१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याबद्दल देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. याची दखल घेऊन केंद्र सरकारने मागच्या शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला. अबकारी करात कपात केल्यानंतर पेट्रोल साडेनऊ रुपयांनी स्वस्त झाले. तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर राज्य सरकारनेसुद्धा मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु ही करकपात चुकीच्या पद्थतीने केल्याचा आरोप पेट्रोलपंपचालकांनी केला आहे.