आग्रा (उत्तर प्रदेश) – देशात गगनाला भिडणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना पेट्रोलपंपचालक मापात पाप करत असल्याच्या घडत आहेत. अशी एक घटना आग्रा येथे उघड झाली आहे. एका ग्राहकाने पाठपुरावा करून ही चूक लक्षात आणून दिली आणि पेट्रोलपंप चालकाची पोलखोल झाली.
आग्रा येथे पेट्रोलचोरीचे एक प्रकरण समोर आले आहे. एका युवकाने २०० रुपयांचे पेट्रोल भरले. त्याला पावतीही मिळाली. परंतु त्याला पेट्रोल कमी भरल्याची शंका आली. त्याने त्या संपूर्ण दिवसातील पेट्रोलविक्रीची माहिती काढली. त्या माहितीवरून असे लक्षात आले की त्या दिवशी फक्त ९० रुपयांचे पेट्रोल भरले गेले. युवकाने पेट्रोलपंप व्यवस्थापकाकडे पेट्रोलचोरीची तक्रार दिली. परंतु पेट्रोलपंप चालकाने युवकाला पूर्ण टाकी भरून देण्याचे लालुच दाखवले.
पीडित युवकाने पुराव्यांसह पेट्रोलचोरीची तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी अंजनी कुमार म्हणाले, हे गंभीर प्रकरण आहे. जिल्हा पुरवठा अधिकार्यांना स्वतः पेट्रोलपंपाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय स्तरावर सर्व पेट्रोल पंपांची चौकशी केली जाणार आहे.
शहीद नगर येथील रहिवासी जावेद यांनी सांगितले, की रात्री १०.२७ वाजेला त्यांनी प्रतापपुरा येथील फ्रेंडस फिलिंग सेंटर येथे अॅक्टिव्हामध्ये २०० रुपयांचे पेट्रोल भरले होते. मशीनमधून पावती मिळाली. त्यामध्ये ९५.०३ रुपये प्रतिलिटरच्या दराने २.१० लिटर पेट्रोल भरल्याचे नमूद होते. परंतु अॅक्टिव्हाचा पेट्रोल मीटर पुढे सरकलेच नसल्याचे जावेद याला निदर्शनास आले आणि त्याला संशय आला.
पेट्रोल पंपाच्या कर्मचार्याला तेव्हा पेट्रोल मीटर पुढे सरकत नसल्याचे सांगितले, तर तो म्हणाला, की त्याने पूर्ण पेट्रोल टाकले आहे. पेट्रोल मीटरबद्दल माहिती नाही. त्याच वेळी जावेदने त्याचा व्हिडिओही बनविला. याबद्दल व्यवस्थापकाला सांगितले, तर त्याने कॉम्प्युटरमधील कस्टमाइझ्ड सेल स्टेटमेंट तपासले. स्टेटमेंटमध्ये रात्री १० वाजून २७ मिनिटांनी २५ सेकंद रोजी ९० रुपयांच्या पेट्रोल विक्रीची नोंद आढळली.