पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषि आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थोत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाला पाहिजे तरच देशाची प्रगती होईल. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषि आणि ग्रामीण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, येत्या काळात संशोधनाला खूप महत्त्व आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोगाद्वारे बदल घडवून आणणे गरजेचे आहे. ज्ञानाचे आर्थिक सुबत्तेत परिवर्तन करणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्या देशात २५ लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. रस्ते वाहतुकीत वाढ होऊन वाहनांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे महत्त्व येत्या काळात कमी होणार आहे. आणि इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक या पर्यायांना खूप वाव आहे. हेच आगामी काळाचे इंधन असणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार १ हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. तेवढे उत्पादन करण्याची आपल्या साखर कारखान्यांमध्ये क्षमता नाही. येणाऱ्या काळात ऊसाचे दर कमी होणार नाही, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून यासाठी मार्ग काढावा लागेल.
नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोल एवढेच होणार असल्याने त्यांच्या किंमतीवरही फरक होईल. इथेनॉल हे हरित इंधन आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होते. पुण्यात इंडियन ऑईलचे तीन पंप सुरू करण्याच्या सूचना कंपन्यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासोबत पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे शासनाने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करण्यास पुढाकार घ्यावा. इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ड्रोनद्वारे फवारणी फायदेशीर आणि अधिक परिणामकारक असल्याने सुशिक्षित युवकांना सहाय्य करून त्यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे खत फवारणीबाबतही शासनाने प्रयत्न करावा. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटने त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्याबाबतही शासनाने विचार व्हावा, अशी सूचना श्री.गडकरी यांनी केली.