मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उन्हाळ्यात धावत्या दुचाकी किंवा चारचाकी पेट घेतल्याच्या अनेक घटना घडत असतात. इंजिन नादुरुस्त झाल्याने किंवा शॉर्टसर्किट झाल्यामुळे वाहने पेट घेतल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. परंतु पेट्रोल किंवा डिझेलने वाहनांच्या टाकी फूल भरल्याने वाहने पेट घेतात का, या प्रश्नावर पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने स्पष्टीकरण दिले आहे.
उन्हाळ्यात पेट्रोल टाकी फूल भरून घेणे धोकादायक असू शकते. तुम्हाला असा मेसेज आला असेल तर सावधगिरी बाळगा. अशा प्रकारचे मेसेज खोटे आहेत. पेट्रोल आणि डिझेलने वाहनांची टाकी फूल भरून घेणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने स्पष्ट केले आहे.
व्हायरल मेसेज
आगामी काळात तापमान वाढणार आहे. आपल्या वाहनांमध्ये जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत पेट्रोल भरून घेऊ नये. असे केल्यास स्फोट होऊ शकतो. या आठवड्यात टाकी फूल भरून घेतल्यामुळे चार स्फोट झाले आहेत. पेट्रोल भरल्यानंतर टाकी उघडी करून ठेवा, जेणेकरून टाकीतील हवा बाहेर निघून जाईल, असे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इंडियन ऑइलचे निवेदन
इंडियन ऑइलने या अफवांचे खंडन केले आहे. ग्राहक वाहनाची इंधन टाकी फूल भरू शकतात. याने कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. हिवाळा असो अथवा उन्हाळा वाहनाच्या इंधन टाकी जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत इंधन भरणे पूर्णपणे सुरक्षित आहे, असे इंडियन ऑइलने आपल्या निवेदनात म्हटले आहे.