नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. मार्च महिन्यापासून कच्च्या तेलाचे दर २० टक्क्यांनी घसरुन १०० डॉलरपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे महागाईने भरडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढल्याने परिणामी इतर वस्तूदेखील महागल्या आहेत. आता कच्च्या तेलाचे दर घसरल्याने पेट्रोल – डिझेलचे भाव कमी होतीलच शिवाय विमानप्रवास, कपडे, पेंट, सिमेंट अशा मुख्य सहा क्षेत्रांना फायदा होऊन या वस्तूदेखील स्वस्त होऊ शकतील. मात्र कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीत अद्यापही पेट्रोल ९६.७२ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. ६ एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एका वेळी प्रति बॅरल १४० डॉलरवर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत १०५.९ डॉलर होती, जी आज प्रति बॅरल ९९.७ डॉलर झाली आहे. WTI ची किंमत प्रति बॅरल ९५.५ डॉलर आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या किंमती करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहे. एक एका वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना सुरु आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. आता इंधन दरात घट झाली तर हे शक्य होऊ शकणार आहे.
मॅकेंजी अहवालानुसार कच्च्या तेलातील घसरगुंडीमुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये पेट्रोकेमिकल्सचा खर्च २० टक्क्यांनी घटला आहे. तर पेंट उद्योगात वापरल्या जाणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त कच्च्या मालात पेट्रोलियम उत्पादनांचा सर्वाधिक समावेश आहे. कच्चे तेल स्वस्त झाल्यास या उद्योगालादेखील त्याचा फायदा होऊ शकणार आहे. कपडे, विमानप्रवास, सिमेंट या उद्योगांनाही त्यामुळे लाभ होणार असून परिणामी महागाई कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.
Petrol Diesel Rates will reduce Common man Relief