नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवण्यात आली असून महिनाभरापूर्वी विक्रमी पातळीवर गेलेल्या क्रूडच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहे. परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची कपात होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो. या घसरणीमुळे किंमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यासही वाव आहे कारण आता किरकोळ विक्रेत्यांचे मार्जिन सकारात्मक झाले आहे. किरकोळ विक्रेत्यांचे मार्जिन पेट्रोलवर प्रति लिटर ६ रुपयांनी सकारात्मक झाले आहे. लवकरच डिझेलवरील १० रुपयांची अंडर रिकव्हरी कमी होईल, असे वाटते. दरम्यान, सात महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
विशेष म्हणजे दि. २२ मे २०२२पासून सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८ आणि ६ रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र दुसरीकडे, तेलाच्या किमती घसरल्याच्या वृत्तादरम्यान २ नोव्हेंबर रोजी देशात आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
ताज्या माहितीनुसार, बुधवार दि.२ नोव्हेंबर रोजी तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे. खरे म्हणजे १ नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ४० पैशांनी कपात अपेक्षित होती, मात्र भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे इंधन तेलाबाबत यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी किती चढ-उतार होऊ शकतात, हे पाहिते. सध्या, रशिया-युक्रेन युद्धाच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती खूपच कमी आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी विंडफॉल टॅक्स म्हणजेच कंपन्यांच्या नफ्यातील वाटा कमी केल्याने देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतींवरील दबाव आता कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे थोडी कपात केली, तर जनतेला महागाईपासून निश्चितच दिलासा मिळेल. शिवाय, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला राजकीय फायदाही होईल आणि महागाईवरून विरोधकांच्या आरोपाला उत्तर देता येईल. याआधी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमनेही संयुक्तपणे १९ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता पुन्हा या कंपन्या नफ्यात आल्या आहेत.
Petrol Diesel Prices Will Reduce Soon