विशेष प्रतिनिधी, मुंबई
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत असून देशातील काही राज्यांमध्ये तर पेट्रोल १०६ रुपये प्रती लिटरपेक्षा अधिक झाले आहेत. पण ही परिस्थिती सध्या तरी अशीच राहणार आहे, असे स्पष्ट करून सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल–डिझेलचे दर जमिनीवर येणार नाही, असेच संकेत दिलेले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी दरवाढीसाठी पुन्हा एकददा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींना दोष दिला आहे. मात्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीवरून, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीशी भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींशी काहीही घेणे देणे नाही. कारण यात तथ्य असते तर गेल्या १७ वर्षांतील सर्वांत कमी दर २०२०-२१ मध्ये बघायला मिळाले असते.
गेल्यावर्षी सरासरी एका बॅरलमागे ४४.८२ डॉलर खर्च करण्यात आले होते. तर २००४-०५ मध्ये सरासरी ३९.२१ डॉलर एवढा दर होता. २०१९-२० मध्ये तेल कंपन्यांनी एका बॅरलमागे ६०.४७ डॉलर खर्च केले होते. गेल्या आर्थिक वर्षात त्यापेक्षा १५.५५ डॉलर कमी खर्च करावे लागले. तरीही या कालावधीत पेट्रोल २१ रुपये आणि डिझेल २९ रुपये प्रती लिटरने महाग झाले.
नव्या आर्थिक वर्षात म्हणजेत एप्रिल ते जून या कालावधीत तेल कंपन्यांनी पेट्रोल ८.९५ रुपये तर डिझेल ८.४९ रुपये प्रती लिटरने महाग केले. पण आता संपूर्ण वर्ष ८० ते १०० डॉलर एका बॅरलमागे मोजण्याची वेळ येऊ शकते, असे संकेत आहेत.
पेट्रोल शंभरी पार
रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त झाले आहेत. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तर १०४ ते १०५ रुपये एका लिटरमागे मोजावे लागत आहेत.