नवी दिल्ली – देशात इंधनाचे दर गगनाला भिडत असताना सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांनी कमी करून केंद्राने यापूर्वीच दिलासा दिला आहे. आता केंद्राच्या आणखी एका निर्णयाने इंधनाचे दर कमी होण्यास मदत मिळणार आहे. आगामी काळात पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.
५० लाख पिंप कच्चे तेल
कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तेल उत्पादक देशांवर दबाव टाकण्यासाठी भारताने अमेरिका, जापान, दक्षिण कोरिया आणि चीन यांच्याशी समन्वय ठेवून आणीबाणीच्या वापरासाठी राखीव ठेवलेले साठ्यातील कच्चे तेल देशांतर्गत वापरासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेल खरेदी केले जाणार नाही. तर आपत्कालीन वापरासाठी साठवण्यात आलेले कच्चे तेल वापरले जाणार आहे.
भारताकडून ५० लाख पिंप कच्चे तेल खुले केले जाणार आहे. गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती ८६ डॉलर प्रतिपिंप होते. आता कच्च्या तेलाची किंमत ७९ डॉलर प्रतिपिंपांच्या आसपास आहे.
अमेरिकेचाही निर्णय
केंद्र सरकारने ही घोषणा करताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात हायड्रोकार्बनची किंमत यथोचित निश्चित करणे आवश्यक आहे. इतर देशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून तेल उत्पादक देश कृत्रिमरित्या कच्च्या तेलाच्या किमती निश्चित करतात. त्याला भारताने नेहमीच विरोध केला आहे. भारताने हा निर्णय घेतल्याच्या काही तासानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सुद्धा पाच कोटी पिंपे कच्चे तेल खुले करण्याचा निर्णय घोषित केला. भारत, जापान, चीन या देशांशी चर्चा करून सामुहिक निर्णय घेतला आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. ओपेक देशांकडून उत्पादन वाढविण्याच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
एवढे घटणार दर
भारत, अमेरिका, जापान, चीन, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनसारख्या कच्च्या तेलाच्या खरेदीदार देशांनी एकमताने निर्णय घेऊन तेल उत्पादक देशांच्या संघटनेवर (ओपेक) दबाव टाकण्यासाठी रणनीती बनविली आहे. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयाचा तेल उत्पादक देशांवर खूप मोठा परिणाम होणार नाही. परंतु बाजारात निर्माण झालेल्या वातावरणामुळे कच्च्या तेलाच्या किमती घटून ७२ डॉलर प्रतिपिंप होऊ शकते. ओपेक देशांनी कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर प्रतिपिंपच्या आसपास ठेवावी, अशी मागणी तेल खरेदीदार देशांकडून केली जात आहे. तेलाच्या किमती यापेक्षा अधिक वाढल्या तर कोरोना महामारीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुधारणेवर परिणाम होईल. पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम अमेरिका, चीन, भारतावर झाला आहे. या देशांमध्ये महागाईचा दरही सर्वाधिक आहे. अमेरिकेच्या फेडरल बँकेनेसुद्धा वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदर वाढविण्याचे संकेत दिले आहेत. भारतात आरबीआयकडूनही महागाईबद्दल इशारा दिला जात आहे.
येथे आहे कच्च्या तेलाचे भांडार
भारतात विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), मंगळुरू (कर्नाटक) आणि पादूर (कर्नाटक) मध्ये आपत्कालीन भांडार आहेत. या ठिकाणी एकूण ३.८ कोटी टन कच्चे तेल साठवले जाऊ शकते. यापैकी भारत सध्या ५० लाख टन कच्चे तेल वापरणार आहे. इतके तेल भारतात दररोज वापरले जाते. सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.