नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रतिपिंपच्या जवळपास पोहोचल्या आहेत. तरीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे देशांतर्गतचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर राहिलेले आहेत. परंतु पेट्रोलियम उत्पादनांसाठी भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारे रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हा वाद चिघळला तर पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल मानक असलेल्या ब्रेंट क्रूडचा भाव ९९.३८ डॉलर प्रतिपिंप वर पोहोचला आहे. या भावावर नफेखोरी झाल्यामुळे अखेर तो ९८ डॉलर प्रतिपिंपच्या वर बंद झाला. यापूर्वी सप्टेंबर २०१४ मध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ९९ डॉलर प्रतिपिंपच्या वर गेला होता. रशिया युरोपमध्ये नैसर्गिक वायूचे जवळपास एक तृतीयांश उत्पादन करतो. जागतिक तेलाच्या उत्पादनात त्याची भागीदारी १० टक्क्यांच्या आसपास आहे. युरोपीय देशांमध्ये जाणारी गॅस पाइपलाइन युक्रेनमधून जाते.
भारताच्या तेल आयातीमध्ये रशियाची भागीदारी खूपच कमी आहे. २०२१ मध्ये भारताने रशियाकडून दररोज ४३,४०० पिंप कच्चे तेल आयात केले होते. भारताच्या तेल आयातीत ही आकडेवारी फक्त एक टक्का आहे. त्याशिवाय भारत रशियाकडून १८ लाख टन कोळसा आयात करतो, ती आकडेवारी फक्त १.३ टक्के आहे. गॅजप्रॉम या रशियन गॅस कंपनीकडून भारत २५ लाख टन एलएनजीसुद्धा खरेदी करतो. त्यामुळे रशियातून पुरवठा होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर भारतासाठी चिंतेची बाब नाही. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ भारतासमोरील अडचणी वाढवू शकते. याच एका विशेष कारणामुळे गेल्या ११० दिवसांपासून देशात इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत.