इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या लग्नसराईचा मोसम सुरू असून लग्न समारंभास उपस्थित राहिल्यावर आहेर किंवा नवविवाहित जोडप्याचा भेटवस्तू काय द्यावी असा अनेकांना प्रश्न पडतो. काही जण पैशाच्या पाकिटाची भेट देतात. तर काही जण कपडे, भांडे किंवा अन्य संसारोपयोगी वस्तू भेट देतात. परंतु काही व्यक्ती आगळी वेगळी भेट देण्याचा प्रयत्न करतात. त्यातच आता काही मंडळींनी नवविवाहित जोडप्याचा चक्क पेट्रोल डिझेलच्या बाटल्या भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कारण पेट्रोल डिझेल सारख्या पदार्थांचा वाढत्या किमती याला कारणीभूत ठरत आहे.
सध्या वाढत्या महागाईने जनता त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास दररोज वाढत आहेत. याशिवाय दूध, औषधे, भाजीपाला आदी वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम आता लग्नाच्या भेटवस्तूंवरही दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील चेंगलपट्टू जिल्ह्यातील चेयुर गावात एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या मित्रांनी पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या भेट दिल्या आहेत. या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 110.85 रुपये आणि 100.94 रुपये प्रतिलिटर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात महागड्या कच्च्या तेलाच्या देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच ही वाढ मे महिन्यातही कायम राहू शकते. याचे कारण देशातील दोन प्रमुख तेल विपणन कंपन्या सौदीच्या आरामकोकडून कमी कच्चे तेल खरेदी करतील.
एका वृत्तानुसार, सौदी देशाने अलीकडेच आशियासाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आशिया खंडातील विविध भागात कच्च्या तेलाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे भारतीय रिफायनरी कंपन्यांनी मे महिन्यात नेहमीपेक्षा कमी तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, करारानुसार भारतीय कंपन्या ठराविक प्रमाणात कच्चे तेल खरेदी करणार आहे. तसेच दि. 1 एप्रिलपासून सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमती दुप्पट केल्या आहेत. यानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढल्या आहेत.