मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई आणखीनच वाढली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता तर पेट्रोलचे भाव दीडशे रुपयांपर्यंत जाणार असल्याची चिन्हे आहेत. त्यापाठोपाठ डिझेलही कडाडणार आहे. त्यामुळे यापुढील काळात सर्वसामान्यांची कठीण परीक्षा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
ऐन दिवाळी सणाच्या काळात सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणीत मोठी भर पडली आहे. कारण देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपयांच्या वर गेला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढीचा हा ट्रेंड कायम राहणार आहे. त्यात आणखीनच वाढ होणार असल्याने त्याची कारणे जाणून घेऊ या…
खरेच भीती आहे का?
एका मार्केट स्टडी आणि क्रेडिट रेटिंग कंपनी गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की, पुढच्या वर्षी क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल 110 डॉलर पर्यंत पोहोचतील. सध्याच्या ते 85 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. मात्र एका अंदाजानुसार, कच्च्या तेलाची किंमत देखील प्रति बॅरल 147 डॉलर या सर्वकालीन उच्च पातळीला स्पर्श करू शकते.
तर पुन्हा वाढतील किंमती
कच्च्या तेलाच्या किमतीची ही पातळी 2008 साली होती. हा तो काळ होता जेव्हा जग आर्थिक मंदीच्या खाईत होते. असे पुन्हा झाल्यास पेट्रोलची किंमत 150 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी डिझेलची किंमत देखील 140 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचू शकते. मात्र, गोल्डमन सॅक्सचा हा अंदाज पुढील वर्षासाठीचा आहे.
दिलासा मिळण्याची आशा नाही
पेट्रोल आणि डिझेलवर सरकारकडून दिलासा मिळण्याची फारशी आशा नाही. जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या कल्पनेला आधीच विरोध आहे. त्याचवेळी सध्या तरी केंद्र सरकार करात कपात करून आपला महसूल कमी करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. अशा स्थितीत त्याचा बोजा हा आता सर्वसामान्यांवर पडू शकतो.
सातत्याने वाढत आहेत किंमती
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35 ते 37 पैशांनी वाढ झाली. दिल्लीत पेट्रोल 108.29 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.02 रुपये प्रति लीटर विक्रमी पातळीवर विकले जात आहे. या महिन्यात आतापर्यंत 28 दिवसांपैकी 21 दिवस तेलाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल 6.65 रुपयांनी तर डिझेल 7.25 रुपयांनी महागले आहे. जुलैमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलच्या दराने 100 रुपयांची पातळी ओलांडली होती.