पेठ – शहरातील अत्यंत वर्दळीचे वस्तीत रस्त्यालगत असणाऱ्या अशोक एकनाथ करवंदे यांचे राहते घराचे मागील बाजूचे दिवसा १ ते २ वाजे दरम्यान दरवाजा तोडून घरातील लोखंडी कपाटातील रोख १ लाख ३५ हजार व सोन्याचे दागिनेसह १ लाख ५३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. हा घरफोडीचा प्रकार दिवसा घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबतचे वृत्त असे की पेठ शहरातील अशोक करवंदे यांचे घराचे मागील बाजूचे दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटचे लॉकर तोडून कपाटात ५०० रुपयांच्या २७० नोटा एकुण १ लाख ३५ हजाराची रोकड तसेच सोन्याचे सहा हजार रुपये किमतीचे २ ओमपान, नऊ हजार किमतीचे २ टॉप्स , कानातील ३ हजार रुपये किमतीची बाळी असा एकुण १ लाख ५३ हजार किमतीचा ऐवज चोरीस गेला. या चोरीप्रकरणी रविंद्र अशोक करवंदे यांच्या फिर्यादी दिली असून पोलिसांनी भादवि कलम ४५४ , ३८० प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पो . नि . दिवाणसिंग वसावे यांचे मार्गदर्शना खाली पोउनि कैलास कपिले अधिक तपास करीत आहेत.