इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुत्रा हा केवळ शोसाठी किंवा हौस म्हणून पाळण्याचं हल्ली फॅडच झालं आहे. विदेशी प्रजातीचे गोंडस कुत्रे घरात हवे, असा बऱ्याच लोकांचा हट्ट असतो. पण प्राचीन काळापासून पाळीव कुत्रा हा प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जात आहे, हेही आपल्याला माहिती आहे. याची प्रचिती देणारी एक घटना अलीकडेच जम्मू-काश्मिरमध्ये घडली.
मालकाशी प्रामाणिक असलेला कुत्रा संकटसमयी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. अलीकडेच जम्मू-काश्मिर येथील राजौरी भागात एका पाळीव कुत्र्याच्या प्रसंगावधानामुळे एक अख्खं कुटुंब दहशतवाद्याच्या हल्ल्यातून वाचलं. या कुत्र्याचं नाव मिशेल असं असून सध्या तो देशभरातून कौतुकास पात्र ठरत आहे. शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी राजौरी भागात हल्ला केला. मिशेलला लांबूनच फायरींगचे आवाज ऐकायला आले. तो अलर्ट झाला आणि त्याने भुंकायला सुरुवात केली. मिशेलला संकटाची चाहूल लागली होती. त्याला हेही माहिती होतं की समोरून येणारा दहशतवादी आपल्याला सुद्धा मारू शकतो. पण त्याने त्याची पर्वा केली नाही. आणि तो जोरजोराने भुंकायला लागला. त्याच्या भुंकण्यामुळे निर्मला देवी आणि त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचले.
दहशतवादी दिसताच…
मिशेल का भुंकतोय हे बघण्यासाठी निर्मलादेवी आणि त्यांची नात बाहेर आले. त्या दोघी बाहेर येताच त्यांना समोरून दहशतवादी आपल्या घराच्या दिशेने येत असल्याचे दिसले. पण त्याने या दोघींना बघितले नव्हते. दोघीही लगेच घरात गेल्या आणि त्यांनी आतून दार पक्कं लावून घेतलं.
एरवी असे होत नाही
या घटनेबद्दल निर्मलादेवी म्हणाल्या की, मिशेल भुंकत असताना आम्ही आपल्या कामात व्यस्त होतो. तो कधीही एवढ्या मोठ्याने भुंकत नाही. त्यामुळे आम्ही सगळे घाबरून बाहेर आलो. त्याला काहीतरी झालं असावं, असं आम्हाला वाटलं. बाहेर आलो तर दहशतवादी आमच्या दिशेने येताना दिसला. आम्ही आत गेलो. त्याने मिशेलवर गोळीबार केला, पण मिशेलने त्याला चकमा दिला. पण मिशेलच्या भुंकण्यामुळे आमच्यासह शेजारचे लोकही अलर्ट झाले होते.
Pet Dog Save Family from Terrorists
Jammu and Kashmir