मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता शाहरुख खानच्या घरासह मुंबई महत्त्वाची ठिकाणे बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी मध्य प्रदेशातील जबलपूरचा रहिवासी आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन केला. तसेच, धमकी दिली की, अभिनेता शाहरुख खानचे घर मन्नतसह मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे सीएसटी रेल्वे स्टेशन, कुर्ला स्टेशन, खारघर येथील गुरुद्वारा हे बॉम्बस्फोटद्वारे उडवून देण्याची धमकी दिली. तत्काळ हा कॉल ट्रेस करण्यात आला. हा कॉल जबलपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आम्ही जबलपूर पोलिसांशी संपर्क साधला. सर्व तपशील त्यांना दिला. जबलपूरच्या गंगानगर भागातील जितेश ठाकूर असे या व्यक्तीचे नाव असून त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.
सीएसपी अलोख शर्मा म्हणाले की,”आम्हाला महाराष्ट्र पोलिसांकडून एक कॉल आला होता. त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी त्यांनी आमची मदत घेतली. आम्ही त्याला पकडले आहे आणि त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”
पोलिसांच्या माहिती नुसार, आरोपी ठाकूर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वीही सीएम हेल्पलाईन आणि डायल १०० वर असे फसवे कॉल केले आहेत. “त्याचा कोणताही हेतू नाही. तो अनेकदा दारूच्या नशेत असतो आणि मग असे कॉल करतो. आम्हाला आढळले की त्याचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले नाही. ज्यामुळे तो अलीकडे अस्वस्थ झाला होता.” असे शर्मा यांनी सांगितले. जबलपूरचे एएसपी गोपाल खांडेल यांनी सांगितले की, महराष्ट्र पोलिसांनी एक मोबाईल नंबर शेअर केला. ज्याच्या आधारे आरोपीला पकडले.