इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – २३ किलो सोने आणि १९६ कोटी रुपयांची रोकड ज्याच्या घरातून जप्त करण्यात आली, त्या पियूष जैनला तब्बल २५४ दिवसांनंतर जामीन मिळाला आहे. अत्तराचा व्यापारी असलेला पीयूष जैन हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे त्याच्या जामीनावरही चर्चा रंगली आहे.
काही महिन्यांपूर्वी पीयूष जैन याच्या घरी छापा मारण्यात आला होता. डायरेक्टर आफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने पियूष जैनच्या कानपूर आणि कनौज येथील मालमत्तांवर छापेमारी केली होती. यात १९६ कोटी रुपये रोख आणि २३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. छापेमारी करण्यासाठी पोहोचलेले अधिकारी १९६ कोटींच्या नोटा बघून अवाक् झाले होते. त्यांना सुरुवातीला काय करावे काहीच सुचले नाही. शेवटी एवढे पैसे मोजण्यासाठी मशीन बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अनेक मशीन बोलावल्या. नोटा मोजायला सगळे अधिकारी व कर्मचारी खाली बसले. जवळपास तीन दिवस ही कारवाई सुरू होती. या संपूर्ण कारवाईची माहिती स्वतः अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितली.
पैसे मोजण्यासाठी ३६ तास
पीयूष जैन यांच्या घरी छापा मारल्यानंतर पुढील तीन दिवस अधिकारी तेथेच होते. फक्त नोटा मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना ३६ तास लागले. त्यासाठी पैसे मोजण्याच्या १९ मशीन्स बोलावण्यात आल्या होत्या. तर २७ अधिकारी कारवाईसाठी नेमण्यात आले होते.
दंडात्मक कारवाई
पीयूष जैन यांच्याविरोधात जीएसटी कर अपवंचना डीजीजीआय आणि परदेशी सोने तस्करीसाठी सुनावणी झाली होती. याच प्रकरणात पीयूष जैन यांच्यावर तसेच त्यांच्या फर्मवर दंडात्मक कारवाई केली आहे. फर्मचे प्रोप्रायटर काहीही बोलायला तयार नसल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.
Perfume Trader Piyush Jain Bail