इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अत्तर व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरात १९७ कोटी रुपये रोख आणि कोट्यवधी रुपयांचे सोने होते ही माहिती समोर आल्यानंतर आता आणखी रहस्यमयी गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्या घरातल्या फरशांमध्ये तसेच तिजाऱ्यांच्या छुप्या कप्यांमध्ये आणखी डोळे दिपावणारी संपत्ती समोर आली आहे. पियूष जैन याच्याविरोधात ३३४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरोप पत्रानुसार जैनचे कानपूरचे घर आणि कन्नोजची कोठी या दोन्हींच्या बांधकामाच्या वेळी अनेक रहस्यमय खोल्या, तळघर, दरवाजे इत्यादी बांधण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी लिहिले आहे की, कानपूरमध्ये २२ डिसेंबर रोजी छाप्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २४ डिसेंबरला एक टीम पियूष जैनच्या मुलांना घेऊन कन्नोजमधील त्याच्या वडिलोपार्जित निवासस्थानी गेली होती. पहिल्या दिवशी त्यांच्या घरात काहीही सापडले नाही. तेवढ्यात एका अधिकाऱ्याची नजर घराच्या छताला लागून असलेल्या दुसऱ्या टेरेसवर गेली. त्या टेरेसचा रस्ता एका घरात जात होता. त्या घरात गेल्यानंतर अनेक अनपेक्षित गोष्टी समोर आल्या. एका आलिशान पलंगाच्या मागे एक गुप्त लोखंडी दरवाजा या तपासणीत दिसून आला. त्यानंतर पथकाने लोहाराला बोलावून लोखंडी दरवाजा कापून घेतला. त्यात जूट कापडाची आठ पोती, १० कोटींहून अधिक रक्कम त्यांना मिळाली. त्यानंतर घराच्या फरशांमध्ये आणखी ऐवज आढळू आला. इतकेच काय तर १२ मोठ्या ड्रम्समध्ये चंदनाचे तेल असल्याचं समोर आलं. याशिवाय, एक किलोच्या २२ सोन्याच्या विटाही तेथे सापडल्या. त्यांच्यासह पाचशे आणि दोन हजार नोटाही तिथे सापडल्या. यामुळे नेमकी अशी किती संपत्ती पियूष जैन याने गोळा केली आहे अशा चर्चा रंगल्या असून तपासणी करणारे अधिकारीही थक्क झाले आहेत.