नवी दिल्ली – कोरोना उपचारांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा देशभरात मोठा तुटवडा आहे. तसेच, ते उपलब्ध करण्यााठी नागरिक हजारो रुपये देण्यास तयार आहेत. मात्र, या इंजेक्शनचा विशेष काही फायदा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यातच आता रेमडेसिविरला अत्यंत उत्तम पर्याय समोर आला असून हे औषध अवघ्या २ रुपयांना उपलब्ध होते. यासंदर्भात रिसर्च सोसायटी ऑफ अॅनेस्थिसिया अँड क्लिनिकल फार्माकोलॉजीचे सचिव प्रा. संदीप साहू यांनी माहिती दिली आहे.
काय आहे हा पर्याय त्याबाबत जाणून घेऊया
कोरोनाग्रस्तांमधील एआरडीएस (अॅक्यूट रेस्पिटरेटरी स्ट्रेस सिंड्रोम) लक्षणे रोखण्यास रेमडेसिविरचा काही विशेष फायदा नाही. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या नुकत्याच झालेल्या संशोधनाचा आधार देत प्रा. साहू म्हणाले की, डेक्सामेथासोन सर्वात स्वस्त आणि सोप्या पद्धतीने मिळणारे औषध आहे. हे औषध एआरडीएस रोखण्यास मदत करू शकते. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये या औषधाचा फायदा दिसून आला आहे. हे औषध २४ तासात एकदा आठ ते दहा मिलिग्रॅम दिल्यास रुग्ण व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता खूप कमी असते.
शास्त्रज्ञांनी दोन हजार कोरोनाग्रस्तांचे परीक्षण केले. त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोन औषध दिले. २८ दिवसांनंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. रुग्णांचा मृत्यूदर कमी होऊन त्यांना व्हेंटिलेटर लावण्याची शक्यता खूपच कमी झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यांना अधिक ऑक्सिजनची गरज असते, त्यांना पहिल्या आठवड्यात रेमडेसिव्हिर दिले तरच रुग्णांना बरे वाटू शकते. रेमडेसिव्हिरचा विशेष अभ्यास झालेला नाही. औषधनिर्माण कंपन्यांकडून ते प्रायोजित केलेले औषध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.










