विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
तुम्ही लसीकरणाला पात्र असलेल्या गटात असाल आणि तुम्ही अजूनही लस घेतलेली नसेल, तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. लशीचा एक डोस घेतल्याने संसर्गाचा दर निम्मा होतो, असे एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे. ऑक्सफोर्ड/एस्ट्रजेनेका या फायझर/बायोएनटेक या लशींच्या एका डोसमुळे कोरोनाचा संसर्ग निम्म्यावर येतो, असे पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचई) एका अभ्यासात म्हटले आहे.
राष्ट्रीय आरोग्य सेवेतर्फे (एनएचएस) सध्या सुरू असलेल्या लसीकरण अभियानांतर्गत जे लोक लसीकरण झाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत संक्रमित झाले. त्यांना लस न घेतलेल्या लोकांपेक्षा संसर्ग होण्याची शक्यता ३८ ते ४९ टक्क्यांहून कमी झाली आहे. लसीकरणाच्या १४ दिवसांनंतर लोकांचे कोविडपासून संरक्षण झाल्याचे आढळले असून, लोकांचे वय आणि संपर्काचा यावर परिणाम झालेला नाही. बुधवारी आलेल्या या अभ्यासाचा तज्ज्ञांकडून अद्याप पूर्ण आढावा घेणे बाकी आहे.
५७ हजार लोकांचा अभ्यास
या अभ्यासादरम्यान २४ हजार घरांमधील ५७ हजारांहून अधिक लोकांना संपर्क साधण्यात आला. तिथे कमीत कमी एक कोविडचा रुग्ण होता. त्याला लशीचा एक डोस देण्यात आला होता. या लोकांची तुलना लस न घेतलेल्या जवळपास १० लाख लोकांशी करण्यात आली. घरात लस घेतलेला व्यक्ती संक्रमित झाल्यानंतर दोन ते १४ दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या कोण्या व्यक्तिला संसर्ग झाल्यास त्याची द्वितीयक रुग्ण अशी संज्ञा करण्यात आली. या अभ्यासातील बहुतांश लोक ६० वर्षे वयापेक्षा कमी होते.