इस्लामाबाद – इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (आयसीआयजे) ने रविवारी पेंडोरा पेपर्स जारी केले आहेत. यामध्ये जगभरातील हायप्रोफाइल व्यक्तींनी जमा केलेल्या आर्थिक रहस्यांचा उलगडा झाला आहे. या पेपरमध्ये पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तारीन यांच्यासह पंतप्रधान इम्रान खान यांच्या निकटवर्तीयांचीसुद्धा नावे आहेत.
या पेपरमध्ये पाकिस्तानमधील सिनेटर फॅसल वावडा, पीएमएल क्यूचे नेते चौधरी मुनिस इलाही, इशाक डार यांचा मुलगा, पीपीपीचे शारजिल मेमन, उद्योग आणि उत्पादन मंत्री खुसरो बख्तियार यांचे कुटुंब, पीटीआयचे नेते अब्दुल अलीम खान, अॅक्सेटचे सीईओ शोएब शेख यांची नावे आहेत. जियो न्यूजच्या वृत्तानुसार, या तपासात एकूण ७०० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांची नावे आहेत. संबंधित व्यक्तींचे परदेशी कंपन्यांशी आर्थिक संबंध होते. या प्रकरणात काही सेवानिवृत्त सैनिक अधिकारी. व्यावसायिक आणि माध्यम कंपन्यांच्या मालकांची नावेही समोर आली आहेत. पाकिस्तानी शोधपत्रकार उमर चिमा आणि द न्यूज इंटरनॅशनलचे फखर दुर्रानी या शोधात सहभागी झाले होते.
गहाळ झालेल्या कागदपत्रांवरून लक्षात आले आहे की, पंतप्रधान इम्रान खान यांचे आंतरिक सर्कलचे प्रमुख सदस्य त्यामध्ये कॅबिनेट मंत्री, त्यांचे कुटुंब आणि प्रमुख आर्थिक समर्थकांचा समावेश आहे. गोपनीयरित्या अनेक कंपन्या आणि ट्रस्टचे ते मालक आहेत. त्यांच्याकडील लाखो डॉलर्सची संपत्ती लपविण्यात आली आहे. परंतु यामध्ये इम्रान खान यांच्याकडे अशी संपत्ती आहे किंवा नाही याचा खुलासा झालेला नाही. कागदपत्रात पीटीआयचे वरिष्ठ नेते आरिफ नकवी यांच्या आर्थिक व्यवहारांचाही खुलासा झाला आहे. त्यांच्यावर फसवणुकीचेही आरोप आहेत.
या पेपर्समध्ये भारतासह जगातील अनेक श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली नागरिकांचे गोपनीय व्यवहार आणि लपविलेल्या संपत्तीबाबत खुलासा करण्यात येणार आहे. दुबई, मोनाको, स्वित्झर्लंड आणि कॅमेन आइसलँडसारख्या देशांमध्ये अनेक परदेशी कंपन्यांच्या तसेच ट्रस्टमागील नागरिकांचा शोध घेण्यासाठी एक कोटीहून अधिक फायलींचा धांडोळा घेण्यात आला आहे.