अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील राजापूर, ममदापुर, रेंडाळे या परिसरात वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. दुपारच्या सुमारास वनविभागाच्या हद्दी लगत शामराव काशिनाथ आहेर यांच्या वस्तीलगत मोकाट कुत्र्यांनी राष्ट्रीय पक्षी मोरावर हल्ला केला. यात त्याच्या मानेला मोठया प्रमाणावर जखमा झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. केवळ मोरच नाही तर हरीण, काळवीट यांच्यावर सुद्धा मोकाट कुत्रे अनेक वेळा एकत्रितपणे हल्ले करत असल्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत. या परिसरातील पोल्ट्री व्यवसायिक मृत कोंबड्या उघड्यावर फेकून देत असल्याने मोकाट कुत्रांच्या तोंडी रक्त लागल्याने ते या वन्यजीवांच्या मागे लागतात. परिणामी त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याने वनविभागाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन्यजीव संरक्षक प्रवीण आहेर यांनी केली आहे.